
हॉटेल चालकाकडून नियमांचे सर्रास उल्लघन; हॉटेल तात्काळ सील करण्याची मागणी
सलाहुद्दीन शेख
जोगेश्वरी: अंधेरी पूर्वेतील शेर- ए-पंजाब, गुरू गोविंद सिंग मार्ग, आनंद विहार को. ऑप. सोसायटीच्या मोकळ्या जागेत साई पंजाब रेस्टॉरंटच्या चालकाकडून महापालिकेच्या नियमांचे उल्लघन करून सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी या साई पंजाब रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याठिकाणी चक्क मे. आनंद टी हाऊसच्या नावाखाली साई पंजाब” मल्टी-क्यूजन रेस्टॉरंट सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आनंद विहार को. ऑप. सोसायटीच्या मोकळ्या जागेतच अनधिकृत शेडखाली हॉटेल थाटण्यात आले आहे. तसेच या शेडखाली महापालिका अग्निशमन दलाची ना हरकत प्रमाणपत्र नसताना देखील विविध पदार्थ शिजवण्यात येत असून ग्राहकांना त्याच ठिकाणी खाण्यासाठी देत असल्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे एखादी आग लागली तर ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊन मोठी जीवितहानी घडण्याची दाट शक्यता आहे.

या ठिकाणी सर्रास महापालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लघन करण्यात येत असून फक्त तयार खाद्य पदार्थ विकण्यास परवानगी आहे, मात्र तसे असतानाही याठिकाणी “साई पंजाब” नावाने मल्टी-क्यूजन रेस्टॉरंट” चालवले जात आहे. या शेडखाली प्रत्यक्ष जागेवर मोठे किचन उभारून पंजाबी, चायनीज अन्न पदार्थ बनवून ग्राहकांना बसून खाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाच्या संगनमताने साई पंजाब” नावाने मल्टी-क्यूजन रेस्टॉरंट” चालवले जात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. महापालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असताना फक्त साई पंजाब” हॉटेल संपूर्ण सील न करता महापालिका के पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाकडून फक्त दंडात्मक कारवाई करण्यात येते. महापालिका प्रशासनामार्फत फक्त दंडात्मक कारवाई करण्यात येते, मात्र सदर हॉटेलवर कडक कारवाई होत नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, कठोर कारवाईला बगल देण्यात येते. महापालिका प्रशासनाने हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन बेकायदेशीर सुरू असलेल्या हॉटेलची शेड निष्कासन करून हॉटेल तात्काळ सील करण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते संदिप कसालकर यांनी केली आहे.
दरम्यान महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र खडादे यांनी खालीलप्रमाणे प्रतिक्रिया दिल्या आहेत:
- सदर हॉटेलवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच वेळा कारवाई करण्यात आली असून मा. न्यायालयाने देखील दंड ठोठावण्यात आला आहे.
- हॉटेल मालक पूर्णाकर शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही.
