प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : राज्यात ऑनलाईन लॉटरीवर कायदेशीर बंदी असतानाही, डोंबिवलीतील राम नगर, टिळक नगर, विष्णू नगर, मानपाडा, कल्याण परिमंडळ-३ पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लॉटरी सेंटर गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु झाले असूनही राम नगर पोलीसांना याची काहीच माहिती नाही असे होऊ शकत नाही. हे अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर दिवसरात्र चालू आहे. अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असून त्यांची कुटुंबे हलाकी आणि हालपेष्टाचे दिवस काढत आहेत. हे अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर आहुजा, भानुशाली नावाच्या व्यक्ती चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

राम नगर पोलीसांच्या नाकावर टिच्चून हा अवैध व्यवसाय सुरू आहे. रामनगर डोंबिवली पोलीसांच्या हद्दीत हा प्रकार घडत असूनही, पोलीसांना याची साधी कल्पना हि नाही हे होऊच शकत नाही असा डोंबिवलीकर नागरिकांचा समाज आहे. या अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर बाबत राम नगर पोलीसांना विचारणा केली असता ते माहिती घेऊन कळवतो असे उत्तर थातूरमातूर देत आहेत. तसेच ठाणे, कल्याण पोलीस कंट्रोल कडून माहिती घेतली असता त्यांनाही या लॉटरीबाबत काहीही माहिती नाही असे सांगण्यात आले.

टिळक नगर, विष्णू नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुद्धा खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर दिवसरात्र सुरु आहेत. एकीकडे शासन ऑनलाईन लॉटरी आणि जुगारावर बंदी घालून सर्वसामान्यांची फसवणूक थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे डोंबिवलीतील स्थानिक पोलीस स्टेशन कोणतीही कारवाई करत नसल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसरात्र चालणाऱ्या या लॉटरीच्या नादात अनेक तरुण, नोकरदार, बिगारी काम करणारे, नशेच्या आहारी गेलेली लोकं कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडून आपली कष्टाची कमाई या जुगारात गमावत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावर होत असून, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.

त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि स्थानिक वरिष्ठ पोलीसांनी तातडीने लक्ष घालून, या अवैध लॉटरी सेंटर चालवणाऱ्या चालक मालकांवरती ताबडतोब कठोर कारवाई करावी तसेच यामागे वरदहस्त असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डोंबिवलीकर नागरिकांकडून जोर धरत आहे.