संदिप कसालकर
जोगेश्वरी परिसरातून हरवलेल्या एका ८ वर्षीय मुलीला तिच्या पालकांकडे सोपविण्यात मेघवाडी पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. दिनांक १३ मार्च ला जोगेश्वरी पूर्व स्टेशन जवळ एक मुलगी रडत असताना जनता जागृती मंच या संस्थेच्या कार्यकर्ता अनिता यांना दिसली. अलिफा नईम अन्सारी असे या मुलीचे नाव असून तिची विचारपूस केली असता ती मेघवाडीतील अमिना नगर येथे राहत असल्याचे कळाले. अनिता यांनी तात्काळ त्या मुलीचा व्हिडीओ काढून जोगेश्वरी पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ता शिवाजी खैरनार यांनी पाठवले.
खैरनार व त्यांच्या टीमने मिळून आतापर्यंत ३४३ हरवलेल्या नागरिकांना शोध घेतला आहे त्यामुळे अशी प्रकरणं कश्याप्रकारे हाताळायची हे सर्व माहीत असल्यामुळे खैरनार यांनी अनिता यांना तात्काळ मेघवाडी पोलीस स्टेशन येथे घेऊन जाण्यास सांगितले. सदर प्रकरणाचा शोध घेण्यासाठी ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक नायडू यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासणी करून व रिक्षाचालकांकडे चौकशी करून अलिफा हि जोगेश्वरी स्टेशन कडे गेले असल्याचे समजले. मेघवाडी पोलिसांनी त्या मुलीच्या पालकांचा शोध घेतला. मेघवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंदर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक नायडू, पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव, तसेच हवालदार प्रदीप यादव व मधुकर माने यांनी त्या मुलीला तिची आई सीमा नईम अन्सारी यांच्या ताब्यात देण्यात आले.