वार्ताहर: संदिप कसालकर

जोगेश्वरी, 17 जुलै 2024 – जोगेश्वरीतील अंबिका नगर परिसरात एक घर अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजु कांबळी असे या घरमालकाचे नाव असून जोगेश्वरी पूर्वेतील मजास रोड, अंबिका नगर येथे दत्तू कांबळे चाळीत सदर घटना घडली असल्याचे समोर आले आहे. हि चाळ ५० वर्षांहून अधिक जुनी असून या घराच्या गॅलरीला भक्कम आधार नसल्यामुळे हे बांधकाम कोसळले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांनी हि घटना घडली. घराच्या वरील भागात कांबळी यांचा मुलगा झोपला होता. स्लॅब कोसळण्यासोबत तो मुलगाही खाली पडला आणि त्याचा हाताला दुखापत झाली आहे. दरम्यान हि घटना कळताच मेघवाडी पोलीस, अग्निशमन दल तसेच पालिकेनं घटनास्थळी धाव घेतली आणि सध्या स्लॅब काढण्याचे काम सुरु आहे.