संदिप कसालकर

मावळातील अनोखा समाजसेवक: हजारो बेवारस वाहनांच्या मार्गदर्शक राम उदावंत

पिंपरी: सामान्यतः पोलिसांच्या आवारात बेवारस वाहने वर्षानुवर्षे धूळखात पडलेली दिसतात. ही वाहने न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली किंवा गुन्ह्यात जब्त केलेली असल्याने मूळ मालक त्यांच्यावर हक्क सांगायला टाळाटाळ करतात. मात्र मावळातील राम उदावंत यांनी याच समस्येतून समाजासाठी नवीन वाट निर्माण केली आहे.

Ram Udavant

राम उदावंत हे परंदवडी, मावळ येथे राहतात. त्यांनी ‘गंगामाता वाहन शोध संस्था’ या नावाने एक अनोखी संस्था स्थापन केली आहे. हे नाव आता केवळ मावळातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस ठाण्यांत मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांनी आपला व्यवसाय सांभाळतानाही समाजहितासाठी हे काम हाती घेतले आहे.

गेल्या काही वर्षांत त्यांनी पोलीस ठाण्यातील अशा बेवारस वाहने शोधून मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्याचे अविरत कार्य केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून हजारो वाहन मालकांना त्यांची वाहने परत मिळाली असून, पोलीस ठाण्यांचा परीसरही स्वच्छ झाला आहे. या कामामुळे पोलिसांमध्ये उत्साहाचे नवे वातावरण तयार झाले आहे.

राम उदावंत यांचे शिक्षण जरी १२वी पर्यंत असले, तरी त्यांचे ज्ञान आणि समाजप्रेम अभूतपूर्व आहे. त्यांनी आयटीआय ट्रेड प्राप्त केल्यानंतर गॅरेज व्यवसाय सुरू केला. पण, समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची धडपड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच गंगामाता वाहन शोध संस्थेचा जन्म झाला.

पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या या उपक्रमाची मोठी दखल घेतली आहे. वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे-पाटील, कृष्ण प्रकाश, संदिप कर्णिक, आणि मनोज पाटील यांसारख्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. २०१७ साली विश्वास नांगरे-पाटील यांच्या कोल्हापूर कार्यकाळात त्यांचा पहिल्यांदा सन्मान करण्यात आला.

राम उदावंत यांनी हे कार्य कोणतेही मानधन न घेता, पूर्णपणे कर्तव्य भावना आणि समाजसेवा म्हणून केले आहे. त्यांची ही सच्ची आणि नि:स्वार्थी सेवा महाराष्ट्रातील इतर समाजसेवकांसाठी प्रेरणादायक ठरली आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे केवळ पोलीसच नव्हे, तर अनेक वाहन मालकही त्यांना आभार मानतात.

गंगामाता वाहन शोध संस्थेच्या वतीने दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!