वार्ताहर: संदिप कसालकर
मुंबई, जोगेश्वरी- १४ ऑगस्ट २०२४: मेघवाडी पोलिसांना 99,500 किमतीच्या चोरीच्या मौल्यवान वस्तू पुनर्प्राप्त करण्यात यश प्राप्त झाले आहे आणि गुन्ह्याशी संबंधित तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जोहरउद्दीन झाकीर हुसेन उर्फ बडा कालू, मलिक सुभाष अष्टे उर्फ मल्ला आणि अश्रफ अली मोहम्मद शेख अशी आरोपींची नावे आहेत.
चोरीच्या वस्तूंमध्ये एक तोळे वजनाची सोनसाखळी, दोन व तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे पैजण व जोडवे यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच मेघवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. फुटेजच्या आधारावर संशयितांच्या हालचाली टिपण्यात आल्या. संशयित हे दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी म्हणून रेकॉर्डवर असल्याचे तपासादरम्यान आढळून आले.
दिंडोशी पोलिस ठाण्याशी समन्वय साधून मेघवाडी पोलिसांनी संतोष नगरमधील संशयितांचे लपलेले ठिकाण शोधून काढले आणि सापळा रचत आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान ही यशस्वी कारवाई मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंदर, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक डेहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा निकम, पोलिस उपनिरीक्षक मनोज भोसले आणि पोलिस हवालदार शेख, वरठा, पाटील, सुरवसे यांचा समावेश होता.