प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : मध्य रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या एका टोळीचा कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलीसांनी परदा फाश केला आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे अटक करण्यात आलेले चौघेही आरोपी तामिळनाडूचे आहेत. आरोपींकडून पोलीसांनी ११ मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप हस्तगत केला आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवली रेल्वे पोलीसांनी एका प्रवाशाच्या मोबाईल चोरी प्रकरणात सत्यराज ओंथुरगा या चोरट्याला ताब्यात घेतले होते. एकीकडे डोंबिवली जीआरपी पोलीस सत्यराज कडून माहिती घेत होते तर दुसरीकडे कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलीस देखील सत्यराज यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास करत होते. मध्य रेल्वेचे डीसीपी मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक अरशद शेख, पोलीस अधिकारी प्रकाश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलीसांना माहिती मिळाली की सत्यराजचे साथीदार प्रवाशांना लुटण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर येणार आहेत. रेल्वे क्राईम ब्रँच पोलीसांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वर सापळा रचत चोरी करण्यास आलेले कृष्णा गणेश, शक्तीवेल अवालुडन, गणेश सेल्वम यांना अटक केली आहे. ही चोरट्यांची टोळी तामिळनाडू राज्यातील वेल्लूर जिल्हा येथील उदय राजा पालयन या गावातुन फक्त चोरी करायला मुंबईत आली होती. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशद शेख यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.