प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे, दि.१२ – ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत सराईत वाहनचोरांच्या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २८ वाहने (दुचाकी व चारचाकी) जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे ठाणे शहर, बृहनमुंबई, नवी मुंबई व ठाणे ग्रामीण हद्दीतील २६ गुन्ह्यांचा छडा लावत वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत १७ लाख ८९ हजार ८९९ रुपये इतकी आहे.

अटक केलेले आरोपी

गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण व घटक-२ भिवंडी यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत खालील आरोपींना जेरबंद केले आहे..
१) अतुल सुरेश खंडाळे (वय:२४ वर्षे, राहणार. हडपसर, पुणे)
२) शेखर गोवर्धन पवार (वय:३० वर्षे, राहणार. जळगाव)
३) आकाश मच्छिंद्र नसरगंध (वय:२३ वर्षे, राहणार. चक्की नाका, कल्याण पश्चिम)
४) गाझी लकीर हुसैन (वय:१९ वर्षे, राहणार. आंबिवली, कल्याण)
५) मुश्ताक इस्तीयाक अंसारी (वय:३१ वर्षे, राहणार. भिवंडी)

उघडकीस आलेले गुन्हे

अटक आरोपींकडून भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, अंबरनाथ, वासिंद, तळोजा, नवी मुंबईसह मुंबईतील धारावी, कांदिवली, माहिम, नवघर पोलीस ठाण्यात दाखल असलेले २६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. यामध्ये भादंवि कलम ३७९ व भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन

ही कारवाई मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उपायुक्त (गुन्हे) ठाणे शहर, व शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-१) ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पथकाची कामगिरी

या तपास मोहिमेत वपोनि. जनार्दन सोनवणे (घटक-२, भिवंडी), वपोनि. अजित शिंदे (घटक-३, कल्याण) यांच्यासह सपोनि. श्रीराज माळी, मिथुन भोईर, सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, तसेच अनेक पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता. महिलांसह जवळपास ५० हून अधिक अंमलदारांच्या अथक प्रयत्नांमुळे ह्या मोठ्या चोरी प्रकरणांची मालिकाच उघडकीस आली आहे. ठाणे पोलीसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरी प्रकरणाला दिलासा मिळाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.