प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) आणि एका पोलीस हवालदाराला लाच घेताना लाचलूचपत विभागाने रंगेहात पकडण्यात आले आहे. ऐन दिवाळीत सणासुदीच्या दिवशी ही घटना उघड झाल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कुशल सापळा रचून ही कारवाई केली, या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक टी.जोशी आणि पोलीस हवालदार व्ही.काळे यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध पुढील चौकशी सुरू आहे.

ज्याच्या हाती जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, तेच भ्रष्टाचारात अडकले, याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “सर्वसामान्य माणसाने कोणाकडे न्याय मागायचा ?” असा सवाल सामान्य लोकातून विचारला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे कल्याण परिमंडळ-३ च्या पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून, संपूर्ण परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.