संजय सावरडेकर

सशस्त्र पोलीस नायगाव चे सपोनि बलभीम ननावरे न्यायालयीन कामासाठी मुंबईहून पुण्यास जात असताना ट्रेनमध्ये एक संशयास्पद व्यक्ती एका ८ वर्षाच्या लहान मुलीस घेऊन प्रवास करत असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. तो इतरांना संशय येऊ नये म्हणून मुलीला न मागताच खेळणी, खाऊ देत होता त्यामुळे मुलगी सुध्दा खुशीने त्याच्यासोबत प्रवास करत होती. मुलीकडे चौकशी करत असताना सदर इसम अधिक संशयास्पद वागू लागल्याचे लक्षात येताच त्यांनी मुलीला तिच्या आईचा फोन नंबर सांगण्यास सांगितले. मुलीने आपल्या मामाचा नंबर देताच त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी सदर मुलगी शाळेतून परतली नसल्याचे व तो इसम मुलीच्या ओळखीचा नसल्याचे निष्पन्न झाले. ननावरे यांनी त्वरित लोहमार्ग पोलिसांच्या व नागरिकांच्या मदतीने आरोपीस पकडून ठेवले व पुणे लोहमार्ग पोलिसांकडे आरोपी व मुलगी दोघांनाही सुखरुप सुपूर्द केले. याविषयीचा गुन्हा वालीव पो.ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.