सलाहुद्दीन शेख

दिनांक :- ०१/०८/२०२४

मुंबई शहरातील व उपनगरातील विविध परीसरातून चोरी केलेले स्मार्टफोन विकत घेवून त्यांचे IMEI बदलुन देशातील विविध राज्यांत विक्री करणा-या टोळी विरुध्द गुन्हे शाखेने कारवाई करुन १६२ स्मार्टफोन जप्त केले.

मुंबई गुन्हे शाखा, कक्ष-६, मुंबई यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, एक इसम हा त्याचे साथीदारांच्या मदतीने चोरीचे मोबाईल खरेदी करून त्याचा आय.एम.ई. आय. क्रमांक बदलून त्याची विक्री करतो अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची आठवडयापासून सातत्याने गोपनीयतेने माहिती गोळा करून, आरोपी इसम व त्याचे साथीदार हे मोबाईल खरेदी करून, त्याची साठवणुक कोठे करतो, नमूद मोबाईलची विल्हेवाट कधी व कशी करतो तसेच इतरही गोपनीय माहिती संकलित करण्यात आली.

दिनांक २९/०७/२०२४ रोजी ठोस माहिती प्राप्त होताच मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ६ मधील पोलीस पथकाने शिवाजीनगर, मुंबई या ठिकाणी मुख्य आरोपीच्या राहते घरात आणि मोबाईल दुरूस्ती व विक्रीच्या एकुण ३ दुकानात विविध पथकांच्या मदतीने अत्यंत नियोजनपूर्वक छापा टाकून विविध नामांकित कंपन्यांचे १६२ स्मार्ट फोन, १ लॅपटॉप, अशी एकूण १५ लाख ८८ हजार ८०० रूपये किमतीची मालमत्ता पंचनाम्यांतर्गत हस्तगत केली.

आरोपी इसम हा त्याचे साथीदार मुंबई शहरातील तसेच राज्यातील विविध परीसरातून चोरी केलेले, स्नॅचिंग केलेले, पिक पॉकिटींग केलेले मोबाईल विकत घेवुन त्याचे आय.एम.ई. आय. क्रमांक लॅपटॉपच्या सहाय्याने बदलुन देशातील विविध राज्यांत विक्रीकरीता पाठवितात. अशा प्रकारे कक्ष ६ पथकाने चोरीचे १६२ मोबाईल फोन म्हणजेच १६२ मोबाईल चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.

त्या अनुषंगाने गुन्हा क. ६४/२०२४, (शिवाजीनगर पो. ठाणे, गुन्हा क. ५३५/२०२४) कलम ३०३(२), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३१७(२), ३१७ (४), ३१८(४), ६१ भा. न्या. संहिता. २०२३ अन्वये दाखल करून ०५ आरोपीत इसमांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मा. न्यायालयाने पोलीस कोठडी दिली असून गुन्हयाचा पुढील तपास कक्ष ६ गुन्हे शाखा करीत आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे), श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. शशि कुमार मीना, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), श्री. विशाल ठाकूर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि- पूर्व), श्री. चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. भरत घोणे, पो. नि. पाटील, स.पो.नि. गावडे, पो.उ.नि. मुठे, पो.उ.नि. रहाणे, म. पो.उ.नि. माशेरे, पो.उ.नि. बेळणेकर, श्रेणी पो.उ.नि. सावंत, श्रेणी पो.उ.नि. सकपाळ, श्रेणी पो.उ.नि. आव्हाड, स.फौ. देसाई, स.फौ.पारकर, पो.ह.क. तुपे, पो.ह.क. जाधव, पो.ह.क. वानखेडे, पो.ह.क. शिंदे, पो.ह.क्र. गायकवाड, पो.ह.क्र. मोरे, पो.ह.क. भालेराव, पो.शि.क्र. घेरडे, पो.शि.क्र. माळवेकर, पो.शि.क. कोळेकर, म. पो.शि.क. अभंग, म.पो.शि.क. सुतार, पो.ह.चा. डाळे, पो.ह.चा.क. कदम, पो.ह.चा.क. जायभाये आणि पो. शि.चा.क. पाटील यांचे पथकाने पार पाडली आहे.