

प्रतिनिधी: अवधुत सावंत
ठाणे : ठाणे शहरात ईद-ए-मिलाद व उद्याच्या अनंत चतुर्दशीच्या गणेशोत्सव विसर्जना निमित्त होणाऱ्या मिरवणुका व या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. ५ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका व धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून, कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी व हे उत्सव शांततेत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

सणांच्या काळात गर्दीचा फायदा घेत चैन स्नॅचिंग, मोबाईल, पर्स व मोटारवाहन चोरीसारख्या घटना घडू नयेत यासाठी विशेष शाखा व गुन्हे शाखेतील साध्या वेशातील पोलीस अंमलदारांची वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत.
सोशल मिडीयावरून धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज, पोस्ट किंवा व्हिडिओ पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मिडीया सेलला विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले असून, अशा प्रकारची माहिती नागरिकांनी मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांनी केले आहे.
बंदोबस्तासाठी उप-पोलीस आयुक्त ११, सहाय्यक पोलीस आयुक्त २६, पोलीस निरीक्षक १००, तसेच ७००० हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार, मुंबई व लोहमार्ग पोलीस, एसआरपीएफच्या दोन तुकड्या व ८०० होमगार्ड्स यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय बंदोबस्तादरम्यान सर्व ठिकाणी ड्रोनचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.
पोलीस प्रशासनाच्या या तयारीमुळे दोन्ही सण शांततेत व उत्साहात पार पडतील, असा विश्वास पोलीस आयुक्त यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.