गारगोटी : प्रतिनिधी
प्रकाश खतकर

सावधान राहा, सतर्कता बाळगा, दक्षता घ्या

संशयास्पद टोळी किंवा व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क करा: पो. नि. गोरख चौधर

भुदरगड तालुक्यात अनोळखी व्यक्ती किंवा टोळी संशयास्पद फिरताना दिसून आल्यास त्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी तर त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील व ग्रामस्थांना पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी उसाचा गळीत हंगाम सुरू आहे. त्या संदर्भाने ऊसतोडीसाठी
परराज्यांतील अनेक टोळ्या दाखल झाल्या आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये पुष्पनगर (ता. भुदरगड) येथील दरोडा प्रकरणात बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या टोळीचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून दरोड्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सध्या प्रचंड थंडीचा कडाका असल्याने रात्रीच्या वेळी नागरिक दारे-खिडक्या बंद करून झोपत असतात, त्यामुळे बाहेरील हालचालींचा अंदाज येणे कठीण होत आहे. तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये अत्यंत पवित्र,
ग्रामस्थांचे आस्था असलेले ग्रामदैवत व अनेक मंदिरे गावामध्ये व गावाच्या परिसरामध्ये आहेत. अलीकडील काळात जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मंदिरांतून दानपेटी व मूर्तीचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडत असताना दिसत आहेत. पोलीस ठाण्याकडून रात्रगस्त नेमण्यात येत आहे; परंतु मनुष्यबळ व जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र याचा विचार करता सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमणे अवघड होत आहे. तरी नागरिकांना विनंती करण्यात येते की गावातील ग्रामदैवत व इतर मंदिरे व प्रार्थनास्थळे या ठिकाणी सुरक्षेसाठी ग्रील किंवा
दरवाजा बसवणे शक्य असल्यास त्याबाबतची कार्यवाही करावी.
गावांमध्ये असलेल्या मंदिर प्रार्थनास्थळांमध्ये ठेवलेल्या दानपेट्या नियमितपणे जबाबदार व्यक्तींनी रिक्त कराव्यात. मूर्तीवर असलेले सोन्या-चांदीचे दागिने बँकेत किंवा गावातील प्रतिष्ठित व जबाबदार व्यक्तींकडे ठेवण्यात यावेत, गावातील मोठ्या मंदिरांची माहिती पोलीस स्टेशनला कळवावी, गावामध्ये वस्तू विक्रीस आलेल्या तसेच संशयास्पद फिरणाऱ्या लोकांची माहिती पोलीस पाटील यांनी आपल्याकडे ठेवावी, अशा सूचनाही पोलीस निरीक्षक चौधर यांनी केल्या आहेत.