
सलाहुद्दीन शेख
सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने जप्त/रेकॉड वरील
बेवारस ६५ वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध
सासवड पोलीस ठाणे येथे जप्त रेकॉर्डवरील/बेवारस वाहने पोलीस ठाणेच्या आवारात बऱ्याच वर्षापासून ६५ वाहने धुळखात पडून आहेत. ती वाहने उन, वारा, पाऊसामुळे त्यांना गंज लागून वाहनांची झीज झाली आहे. बऱ्याच वाहनावरील रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर गंजलेले आहेत. त्यामुळे शोध घेताना बरीच अडचण येत आहे. तसेच सदर ठिकाणी दुर्गधी पसरल्याने पोलीसांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे सासवड पोलीस ठाणे येथे दाखवून सात दिवसांच्या आत घेवून जावे अन्यथा पोलीसांकडून त्या वाहनांची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यात येईल असे आवाहन सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, संतोष घोळवे यांनी केले आहे..
पोलीस ठाणेस शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रकीयेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ती वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्ष मालकांच्या प्रतिक्षेत धुळ खात पडून आहेत. या पार्श्वभुमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल , अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग, सासवड राजेद्रसिंह गौर, यांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेवून ती वाहने मुळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष घोळवे सासवड पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे, मुददेमाल कारकुन पोहवा नंदकुमार फडतरे यांचे पथक नेमून त्यांना आदेश दिले. त्यासाठी नमुद पथकाने परंदवाडी, तळेगांव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत व उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे यांची माहिती काढून त्यांची मदत घेतली. राम उदावंत यांनी सासवड पोलीस ठाणे येथे येवून सर्व वाहनांची पाहणी केली. वर नमूद अंमलदारांच्या मदतीने सर्व वाहनांचे चेसीस नंबर, इंजिन नंबर क्रमांकावरून वाहनांचा मुळ मालकचा शोध घेणकरीता प्रादेशिक परीवहन विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड येथे पत्रव्यवहार करून मुळ मालकांचा शोध लावला. तसेच गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने वाहन मालकांना पत्र पाठविण्यात येणार आहे, तरी सदरच्या वाहन मालकांनी पत्र मिळताच आपले वाहन पोलीस ठाण्यात येऊन तपासुन खात्री करावी व वाहनाची कागदपत्रे दाखवुन योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून आठ दिवसांत सासवड पोलीस ठाणे येथुन घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तरी सदरची वाहने घेवून न गेल्यास कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात येईल असे पोलीस निरिक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले आहे.