![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Image-2023-09-27-at-10.53.00-1.jpeg)
![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Image-2023-09-27-at-10.53.00-1024x768.jpeg)
संदिप कसालकर
मुंबई. महाराष्ट्रासह देशभरात गणरायाचे आगमन झाले आहे. विविध मंडळांनी यथाशक्ती बाप्पाची सेवा केली, बरेच सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम या दरम्यान करण्यात आले. दरम्यान दीड दिवस, ५ दिवस तसेच ७ दिवसांसाठी विराजमान झालेल्या गणरायाचे साश्रू नयनाने विसर्जन करण्यात आले. १० दिवसांच्या गणेशोत्सवानंतर उद्या म्हणजेच २८ सप्टेंबर २०२३ रोजी गणरायाचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे आणि याच दिवशी ठिकठिकाणी ईद-ए-मिलाद जुलूस देखील निघणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने मेघवाडी पोलीस ठाणेचे संपूर्ण पथक हे जोगेश्वरी पूर्वेतील लोकमान्य टिळक गणेश विसर्जन स्थळी आणि ईद-ए-मिलाद जुलूस ठिकाणी सज्ज असणार आहे. दरम्यान विसर्जन सोहळा आणि मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद जुलूस शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी मेघवाडी पोलीस ठाणेतर्फे दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी पंत हॉल येथे विभागातील गणपती मंडळाचे कार्यकर्ते व मोहल्ला कमिटी महिला दक्षता समिती तसेच मुस्लिम बांधव जमात कमिटीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित मंडळांना तसेच जमात कमिटीला खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आले
आपापल्या मंडळाच्या मिरवणुका शांततेत दिलेल्या मार्गाने जावे
मिरवणुकीमध्ये डीजे चा वापर करू नये
स्वयंसेवकांची नेमणूक करावी
रस्त्यावर रस्सीचा वापर करावा
वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी
मिरवणुका व जुलूसच्या वेळी कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची खबरदारी घेण्यात यावी व पोलिसांना सहकार्य करावे
या प्रसंगी ६० ते ६५ महिला व पुरुष सभासदांची उपस्थिती पाहायला मिळाली. या संपूर्ण सभेचे आयोजन परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त (मेघवाडी विभाग) अविनाश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मांढरे, पोलीस निरीक्षक भगत, पोलीस निरीक्षक सकुंडे यांनी उपस्थित मंडळांना व जमात कमिटीला मार्गदर्शन केले.