मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे, असा मजकूर असलेली एक चिठ्ठी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणावर अर्पण करण्यात आली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी रणजीत नरोटे यांनीही एक नवस केला आहे. “अजित पवार लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे,” असा मजकूर असलेली एक चिठ्ठी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणावर अर्पण केली आहे. राज्यात गणोशोत्सवाची धूम सूरू आहे. आज गणेशोत्सवाचा नववा दिवस आहे. मंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये राज्यभरातून लोक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाला तर विदेशातूनही अनेक नागरिक येतात. येथे राज्यातील अभिनेते, अभिनेत्री, उद्योगपती, राजकीय नेते ही मंडळी यांची देखील रांग लागलेली असते. नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागच्या राजाची ख्याती आहे. असाच एक नवस नरोटे यांनी देखील केला आहे.
अजित पवार यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांच्याबरोबर पार्थ पवार, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी रणजीत नरोटे यांनी लिहलेली एक चिठ्ठी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली. त्यावर “हे लालबागच्या राजा, आमचे अजितदादा पवार लवकरात लवकर ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे”, असे लिहिलेले होते.
मुख्यमंत्री पदाची इच्छा
अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री पद हवे आहे. तशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली आहे. इतकेच नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा त्यांचे बॅनरही लावले आहेत. यातच आता या पठ्ठाणे तशी चिठ्ठीच लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी चर्चा सुरू झाली आहे.