मुंबई, २४ जानेवारी २०२५ – भांडुप (प.) येथील मंगतराम पेट्रोल पंप आणि जमील नगर भागात वनविभाग आणि वाइल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या संयुक्त कारवाईत ३७ अलेक्झांड्रिन पोपटांची सुटका करण्यात आली. या छाप्यात ३६ बालपोपट आणि १ प्रौढ पोपट आढळले.

या मोहिमेअंतर्गत बेकायदेशीर वन्यजीव तस्करी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, दोन बालपोपट जखमी अवस्थेत सापडले असून त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ही कारवाई राउंड ऑफिसर यमगर आणि मुंबई रेंज नाईट पेट्रोलिंग टीमच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

सुटका करण्यात आलेले सर्व पोपट वाइल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या पुनर्वसन केंद्रात नेण्यात आले असून, योग्य काळजी घेतल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल.