संदिप कसालकर

जोगेश्वरी, १२ जानेवारी २०२५ – रस्ते वाहतूक सुरक्षा दिनाचे औचित्य साधत जोगेश्वरी पूर्वेतील शामनगर लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव सिग्नल व जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा हॉस्पिटल समोरील सिग्नल येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रिदम डान्स अकॅडमीच्या सहकार्याने फ्लॅशमॉफद्वारे जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमात हेल्मेटचा वापर, वाहनाचा वेग मर्यादित ठेवणे, रस्ता क्रॉस करताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर, आणि चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर यांसारख्या वाहतूक नियमांची होर्डिंग्जद्वारे माहिती देण्यात आली. या जनजागृती उपक्रमाला जोगेश्वरीतील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, विशेषतः शामनगर तलावाजवळ नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

या उपक्रमात रिदम डान्स अकॅडमीचे ३०-४० सदस्य, त्यांचे पालक, आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांच्यासह त्यांचे सहकारी प्रवीण सावंत, संतोष सावंत आणि सौ. रुपल खैरनार यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेघवाडी पोलीस स्टेशन, जोगेश्वरी पोलीस स्टेशन, जोगेश्वरी वाहतूक विभाग, एमआयडीसी वाहतूक विभाग तसेच जोगेश्वरीतील विविध गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सव मंडळांचे विशेष सहकार्य लाभले.

सामाजिक कार्यकर्ता आणि पोलीस मित्र शिवाजी खैरनार यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी नागरिकांचे आभार मानले.