प्रतिनिधी: संदिप कसालकर
एका अल्पवयीन मुलाने आपल्याच घरातून तब्बल ४,५०,०००/- रुपये लंपास केल्याची घटना जोगेश्वरी पूर्वेत घडली आहे.
टी.व्ही. तसेच सोशल मीडिया वर दररोज नवीन नवीन गॅजेट्सच्या असंख्य जाहिराती आपण पाहत असतो. त्यात मुलांना जास्त क्रेझ हे मोबाईल्स, स्मार्ट वॉच सारख्या गॅजेट्सचे असल्याचे पाहायला मिळते. असे गॅजेट्स मिळविण्यासाठी कधी कधी मुलं आपल्या आईवडिलांकडे हट्ट करतात तर काही मुलं समजूतदार देखील असतात. पण काही लहान मंडळी ईच्छा पूर्ण न झाल्यास टोकाचं पाऊल उचलतात.

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरो रिपोर्ट:
राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरो रिपोर्टच्या अनुसार महाराष्ट्रात मागील वर्षी २०२२ रोजी अल्पवयीन मुलांनी केलेल्या एकूण ४४०६ सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यानंतर मध्यप्रदेश ३७९५ आणि राजस्थान ३०६३ तथापि दिल्लीत गुह्यांचा दर ४२% तर महाराष्ट्रात १२% आणि मध्य प्रदेशात १३% आहे.

घटनेचा तपशील:
मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात एका अल्पवयीन मुलाने आपल्या राहत्या घरातून ४,५०,०००/- रुपये लंपास करून एक मोबाईल, स्मार्ट वॉच, पॉवर बँक तसेच इतर नवीन वस्तू खरेदी केली. आपला मुलगा पेन व वही आणण्यासाठी जोगेश्वरी पूर्वेतील महाराज भवन येते जाऊन येतो असे म्हणून गेला आणि आलाच नाही असे त्याच्या पालकांकडून सांगण्यात आले आहे. बराच वेळ मुलगा घरी न परतल्याने पालकांना वाटले कि आपला मुलाचे कोणीतरी अपहरण केले आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ मेघवाडी पोलीस ठाणे गाठले. मेघवाडी पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गु.र.क्र. ४५१/२०२३, कलम ३६३ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद केला. दरम्यान कपाटातील ४,५०,०००/- मिळून न आल्याने आपल्याच मुलाने ती रक्कम घेऊन गेल्याचा संशय देखील पालकांना आला.

मेघवाडी पोलिसांचा तपास:
गुन्ह्याची नोंद होताच मेघवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक विष्णुपंत तिडके व पोलीस उप-निरीक्षक बिरजू गुसिंगे यांनी आपल्या पोलीस पथकासह त्या मुलाचा शोध जोगेश्वरी गुंफा, जोगेश्वरी स्टेशन, अंधेरी स्टेशन, बांद्रा टर्मीनल, दादर स्टेशन, बोरीवली स्टेशन, गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह व जुहू या परिसरात सलग दोन दिवस सातत्याने घेतला आणि दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी त्या मुलाचा शोध घेत असताना पोलीस उप-निरीक्षक विष्णुपंत तिडके व पोलीस हवालदार अनिल खुले हे सायंकाळी ०७:१५ वाजता अंधेरी रेल्वे स्टेशन येथील रेल्वे पोलिसांच्या मदतीने जोगेश्वरी रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असताना ०७:५० वाजता तो मुलगा जोगेश्वरी रेल्वे स्टेशन वरील फलाट क्रमांक २ वर दिसला असता त्या मुलास मेघवाडी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. दरम्यान त्या मुलाची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये १) एकूण रोख रुपये २,५१,१२०/-, २) एक Oppo find N3 Flip मोबाईल, किंमत रुपये ९९,९९९/- ३) एक Croma कंपनीची स्मार्ट वॉच, किंमत रुपये ३,९९९/-, ४) एक पॉवर बँक, किंमत रुपये ३,४९९/- असे रोख रक्क्म व नवीन वस्तू खरेदी केल्याचे मिळून आले. त्यानंतर सदर मुलास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर यशस्वी कामगिरीत सहभाग असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती:
सदरची यशस्वी कामगीरी पोलीस सह आयुक्त (का व सु) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग परमजित सिंह दहिया, पोलीस उप आयुक्त परि. १० दत्ता नलावडे, सहा. पोलीस आयुक्त, मेघवाडी विभाग, विनायक मेर, प्र. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय साळुंके व पोलीस निरीक्षक (गुन्हे), प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. विष्णुपंत तिडके, पो.उप.नि. बिरजू गुसिंगे, पो.ह. अनिल खुले व पो.शि. अनिकेत निकम यांनी पार पाडली.