
प्रतिनिधी: अवधुत सावंत
ठाणे – गुन्हे शाखा, वागळे युनिट क्र.५ कडून वाहने भाडयाने लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या इसमाकडून रू. २,४४,१५,०००/- रु. किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण, परभणी येथून जप्त करण्यात आली आहेत.
वागळे इस्टेट पोलीस ठाणे, येथे गु.र.नं ४०/२०२६ भा. न्या. सं कलम ३१८(४), ३१६(२) अन्वये दि. ०५/०२/२०२६ रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची ५ चारचाकी वाहने आरोपी नामे संदिप रघु शेट्टी, राहणार: उलवे, नवी मुंबई याने मासिक भाडे देण्याचे आमिष दाखवून कोणतेही भाडे न देता, तसेच त्यांची वाहने परत न देता त्या इतर व्यक्तीकडे परस्पर गहाण ठेवून, फिर्यादी यांच्या वाहनांचा अपहार करून त्यांची फसवणुक केली होती. तसेच आरोपी संदिप शेट्टी हा स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता.
सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण व तसेच गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमीवरून आरोपी संदिप रघु शेट्टी (वय: ३८ वर्ष) यास दि. ०६/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपी शेट्टीकडे केलेल्या चौकशीदरम्यान त्याने अशाप्रकारे अनेक व्यक्तींना अधिकचे मासिक भाडे देतो असे आमिष दाखवून त्यांची चारचाकी वाहने ताब्यात घेवून त्या परस्पर इतरांकडे गहाण ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. सदरबाबत अधिक सखोल तपास केल्यानंतर आरोपीकडून सुमारे रु. २,४४,१५,०००/- रू. किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण, परभणी येथून जप्त करण्यात आली असून सदर वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद युवराज पाटील हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, मा. सहा पोलीस आयुक्त (शोध-१ गुन्हे) शेखर बागडे साो. यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-५ वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, सपोनिशरद पाटील, पोहवा. विजय काटकर, रोहिदास रावते, हर्षद तारी, संदिप शिंदे, पोना. तेजस ठाणेकर, सचिन बंडगर, पोकाँ. मिनीनाथ शिकारे, यश यादव या पथकाने केली आहे.