

प्रतिनिधी: अवधुत सावंत
ठाणे दि.२९ : ठाणे पोलीस आयुक्तालयात नेमणुकीत असलेल्या सहायक पोलीस आयुक्त. श्रीमती ममता लॉरेन्स डिसोजा, नेमणूक, विशेष शाखा, ठाणे शहर तसेच पोलीस उप निरीक्षक. महादेव गोविंद काळे, नेमणूक, विशेष शाखा, ठाणे शहर या दोन अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल ७६ वा प्रजासत्ताक दिन रविवार दि.२६ जानेवारी २०२५ रोजी मा. राष्ट्रपती, भारत सरकार यांचे पोलीस पदक जाहीर झाले असुन त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे व मा.पोलीस आयुक्त, ठाणे शहर, श्री.आशुतोष डुंबरे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सहायक पोलीस आयुक्त. श्रीमती ममता लॉरेन्स डिसोजा, नेम. विशेष शाखा, ठाणे शहर यांची पोलीस दलात ३४ वर्ष सेवा झाली असुन त्या १९९० साली पोलीस उप निरीक्षक या पदावर पोलीस दलात रुजु झाल्या होत्या. त्यांच्या सेवेच्या संपुर्ण कालावधीमध्ये त्यांना २९५ बक्षिसे, प्रशस्तिपत्रक देवुन गौरविण्यात आले असुन त्यांना मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सन्मानचिन्हाने देखील गौरविण्यात आलेले आहे. त्या कामोठे पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना २ वर्षे ९ महिने वयाच्या मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचाराच्या गुन्ह्याचा त्यांनी उत्कृष्ठ तपास करून भौतिक पुरावे गोळा करून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सदर गुन्ह्याच्या सर्वोत्कृष्ठ तपासाबाबत त्यांना मा. केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांचेकडुनही गौरविण्यात आले आहे.

पोलीस उप निरीक्षक. महादेव गोविंद काळे, नेम. विशेष शाखा, ठाणे शहर हे १९८८ मध्ये पोलीस शिपाई या पदावर पोलीस दलात रुजु झाले होते. त्यांच्या ३७ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेच्या कालावधीत त्यांना १९० बक्षिसे, प्रशस्तिपत्रक देवुन गौरविण्यात आले असुन त्यांना मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सन्मानचिन्हाने देखील गौरविण्यात आलेले आहे. तसेच सन २००० मध्ये गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे शहर येथे कर्तव्यास असताना हिजबुल या दशहतवादी संघटनेचे ४ अतिरेकी हे मुंब्रा परिसरात मोठा घातपात करण्यासाठी शस्त्रासह लपले असल्याची माहिती काढुन सदर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली आहे. सदर दोन्हीही पोलीस अधिकाऱ्यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस पदक जाहिर झाल्याबद्दल ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केलेले आहे.