संदिप कसालकर
मुंबई : मुंबई शहराला दररोज ४२०० मिलियन लिटर पाण्याची आवश्यकता असून, प्रत्यक्ष पुरवठा फक्त ३८०० मिलियन लिटरच होत असल्यामुळे ४०० मिलियन लिटर पाण्याचा गंभीर तुटवडा जाणवत आहे. वाढती लोकसंख्या, नव्या इमारतींचे बांधकाम आणि झोपडपट्टी पुनर्वसन यामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने हा प्रश्न अधिक जटिल बनत आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र दत्ताराम वायकर यांनी केंद्रीय जल शक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. त्यांनी मुंबईतील पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

भविष्यातील पाणी मागणी आणि उपाययोजना:

२०३१: ५३२० मिलियन लिटर पाण्याची गरज असेल.

२०४१: ही गरज ६४२४ मिलियन लिटरपर्यंत जाईल.

अधिक निधीची गरज:

मुंबई महानगरपालिकेने गारगाई आणि पिंजाळ धरणांमधून अनुक्रमे ४४० मिलियन लिटर व ८६५ मिलियन लिटर पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव मांडला आहे. याशिवाय, सांडपाण्याच्या पुनर्वापराच्या सात प्रकल्पांमधून २४६४ मिलियन लिटर पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

या प्रकल्पांसाठी एकूण २७,३०९ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. केंद्र सरकारने देशातील पायाभूत विकासासाठी ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपयांचा प्रावधान केले असून, त्यातील काही निधी पाणी पुरवठा प्रकल्पांसाठी वापरण्याची मागणी खासदार वायकर यांनी केली.

केंद्रीय मंत्री पाटील यांनी याबाबत सकारात्मक दृष्टीकोन दाखवत लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

वर्षा जल संचयन: २००२ पासून १००० चौ. मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या इमारतींना वर्षा जल संचयन बंधनकारक केले गेले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी आजतागायत प्रभावीपणे झालेली नाही.

कोयना धरणाचे अतिरिक्त पाणी: कोयना धरणातील अतिरिक्त पाणी मुंबईकडे वळवल्यास पाणी संकटावर तोडगा निघू शकतो.