प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवलीतील माणकोली-मोठागाव ठाकुर्ली उड्डाणपुलावर रेस लावून स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकांना विष्णूनगर पोलीसांनी मंगळवारी चांगलाच दणका दिला. मोटार वाहन कायद्यानुसार संबंधितांकडून दंड वसूल करून पुन्हा असे प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

पीयूष म्हात्रे (२१), वेदांत सावंत (१८), प्रदीप ढाकणे (२१) या वाहनचालकांसह रेसिंगचा व्हिडिओ तयार करणारे विशाल विश्वकर्मा (२१), कृष्णा विश्वकर्मा (१९) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

महत्त्वाचे म्हणजे इन्स्टाग्रामवर मैत्री करून संबंधितांनी कार, जीप रेसिंसाठी व्हॉट्सऍपवर एक ग्रुप तयार केला होता. त्या सर्वांवर पोलीसांनी कारवाई केली आहे.

भाजप नगरसेवकाची पोलिस आयुक्तांकडे तक्रार

माणकोली उड्डाणपुलावर सुरू असलेल्या जीवघेण्या रेसिंग स्टंटबाजी प्रकरणी भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी स्थानिक पातळीवर कारवाई होत नसल्याने थेट ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे तक्रार केली होती.

विष्णूनगर पोलीसांनी तातडीने कारवाई करत संबंधितांना दंड ठोठावत तंबी दिली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे यांचे पथक आणि डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे पथक यांनी ही कारवाई केली.