संकलन: चंद्रकांत शेळके, तहसीलदार, अंबड, जि. जालना
छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवत जयसिंगराव घाटगे . कागलच्या प्रसिद्ध घाटगे घराण्यातील यशवंत यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर येथे झाला. शाहू महाराज यांचा विवाह बडोद्याचे सरदार खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी 1891 साली झाला. विविध प्रकारचे प्राणी जोपासणं, हत्ती-चित्ते यांची जोपासना, शिकार, कुस्ती यावर त्यांचं विशेष प्रेम होतं . कुस्तीची मैदानं भरवून कुस्तीचा आनंद ते घेत असत. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांच्याकडे कोल्हापूरच्या राज्यकारभाराची सूत्रं आली. शाहू महाराजांनी आपल्या सामाजिक बदलांच्या चळवळीला अगदी आधीपासूनच प्रारंभ केला होता . डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे स्थापनेपासूनचे अध्यक्ष होते. पन्हाळ्याला चहा कॉफीची लागवड करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे भुदरगड भागातही चहाची लागवड सुरू झाली. कोल्हापूरला ऊसाच्या उत्पादनामुळे भरपूर गुळ तयार होत असला तरी तिला बाजारपेठेचं स्वरुप आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी कोल्हापूर शहरात शाहूपुरी ही व्यापारी पेठ सुरू केली.
वेदोक्त प्रकरण
1899 साली हे प्रकरण कोल्हापूरामध्ये घडले. कार्तिक महिन्यात शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी जात असत. यावेळेस त्यांच्या परिवारातले काही सदस्य बंधू बापूसाहेब महाराज, मेहुणे मामासाहेब खानविलकर आणि स्नानाच्यावेळेस मंत्र म्हणणारे नारायण भटजी असत. एकेदिवशी महाराजांचे स्नेही आणि प्रकांड पंडित राजारामशास्त्री भागवतही होते. महाराजांचे स्नान सुरू असताना भटजी म्हणत असलेले मंत्र वेदोक्त नसून पुराणोक्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी हे महाराजांच्या लक्षात आणून दिलं. महाराजांनी भटजींना विचारताच त्यांनी शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगावे लागतात असं उत्तर दिलं. या वेदोक्त प्रकरणाचे पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात न पडते तरच नवल. यातून एकप्रकारचा संघर्षच निर्माण झाला. पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर जातीतींल मुलांना वेद शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी थेट वैदिक स्कूल काढूनच आपल्या कृतीतून उत्तर दिले.
विविध विकासकामे:
राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याकाळातील सर्वात मोठा भाग हा त्यांच्या शैक्षणिक बदलांनी भरलेला आहे. सर्व जातींच्या मुलांना, मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी कोल्हापुरात जातीनुरुप वसतीगृहे काढली. 1901 सालीच त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली . त्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी मागास जाती-जमातीतल्या लोकांसाठी सरकारी नोकरीमध्ये निम्म्या जागा राखीव ठेवण्याचा आदेश काढला . शंभर वर्षांपुर्वी असा क्रांतिकारक निर्णय घेणं मोठं धा़डसाचं आणि आश्चर्याचं काम होतं.
1906 साली शाहू महाराजांनी कोल्हापुरात कापडगिरणीही सुरू केली. यापुर्वीही त्यांनी कापडउद्योगासाठी संस्थानात प्रयत्न केले होते. किर्लोस्करांना महायुद्धाच्या काळात लोखंडाची कमतरता भासली तेव्हा शाहू महारांजांनी संस्थानातील लोखंडी तोफा देऊन त्यांच्या कारखान्याचे उत्पादन कायम राहावे यासाठी मदत केली. नंतरच्या काळातही त्यांनी अशी लोखंडासाठी मदत देऊ केली होती.
संस्थानातील उद्योगाची, शेतीची भरभराट व्हावी यासाठी त्यांनी कोल्हापूर संस्थानात धरण आणि कालव्यांची योजना आखली.
म्हैसूर संस्थानच्या सर एम. विश्वेश्वरय्या यांनीही संस्थानची पाहणी केलेली होती. 1909 साली राधानगरी धरणाचे कामही सुरू झाले.
उद्योगाबरोबरच त्यांनी सहकारी संस्थांना चालना देण्याचं काम केलं.
6 मे 1922 रोजी शाहू महाराज यांचे मुंबईतील पन्हाळा लॉज या निवासस्थानी निधन झाले. बदलाच्या सांध्यावर उभ्या असलेल्या महाराष्ट्रात कला, क्रीडा, साहित्य, सुधारणा, शिक्षण, उद्योग, शेती अशा सर्वच क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी आपलं मार्गदर्शन केलं होतं . दोन वर्गातील भेद नष्ट व्हावा यासाठी राजसत्तेचा, अधिकाराचा सुयोग्य वापर करणारं नेतृत्व त्यांनी जोपासलं . समाजाची सुधारणा म्हणजेच देशाची सेवा हे एकमेव ब्रीद त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं. 48 वर्षांचं अल्पायुष्य मिळालेल्या शाहू महाराजांनी पुढच्या अनेक शतकांच्या सुधारणा करुनच विश्रांती घेतली.