प्रतिनिधी: अवधूत सावंत

भिवंडी : वर्गात शिकणाऱ्या मित्रानेच १४ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याने पीडिता २ महिन्यांची गरोदर राहिल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या वर्गमित्र नराधमाने पळ काढला आहे.

एका १४ वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय वर्गमित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे अल्पवयीन पीडिता दोन महिन्याची गरोदर राहिल्यानं ही घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून १४ वर्षीय वर्गमित्रावर अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलीसांनी तपास सुरू केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी प्रसार माध्यमांना दिली.

घरी कोणी नसताना मैत्रिणीवर केला बलात्कार

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी भिवंडी तालुक्यातील अंजूर गाव परिसरात कुटुंबासह राहत आहे. तर तिचा १४ वर्षीय वर्गमित्र याच गावात कुटुंबासह राहत असून दोघंही गावाजवळ असलेल्या एका शाळेत शिक्षण घेत आहेत. दोघात मैत्री असल्यानं एकमेकांच्या घरी त्यांचं येणं जाणं होतं. त्यातच मे महिन्यात शाळेला सुट्टी असताना तसेच घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मित्राने पीडित विद्यार्थिनीला बहाण्यानं आपल्या घरी बोलावलं. त्यानंतर पीडितेवर वर्गमित्राने बलात्कार केला. दरम्यान पीडित विद्यार्थिनीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या घरच्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी उपचार सुरू असताना पीडित विद्यार्थिनी दोन महिन्याची गरोदर असल्याचं समोर आल्याने तिच्या कुटुंबाला धक्काच बसला.

बालिका गर्भवती असल्याचं कळताच मुलगा फरार

पीडितेच्या कुटुंबानं ११ जुलै रोजी नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडितेवर घडलेल्या प्रसंगाचं कथन करताच १४ वर्षीय वर्गमित्रावर भारतीय न्याय संहिता कलम 64 (2) (उ ) 65 (1) सह पोक्सो कायद्याचं कलम 4 आणि 6 नुसार गुन्हा दाखल केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबने यांच्याशी संपर्क साधला असता, “पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलगा फरार झाला असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झालं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश महादावाड करीत आहेत,” असं त्यांनी यावेळी सांगितले.