वार्ताहर: सुदर्शन कदम
नाशिकरोड पोलिसांनी धडक कारवाई करत घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीच्या ३ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून तब्बल १६,७६,४५०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये २५ तोळे सोनं, चांदीचे दागिने, दुचाकी, आणि गुन्ह्यासाठी वापरलेली साधनं जप्त करण्यात आली आहेत.
शिवाजीनगर आणि जेलरोड भागात ७ जानेवारी २०२४ रोजी घरफोडीची घटना घडली होती. पोलिसांनी तपासाच्या चक्राला वेग देत सिन्नर फाटा येथील सिटी लिंक बस डेपो परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं. अटक आरोपींची नावं अफजल हुसेन सैय्यद, विक्की उर्फ विकास पटेकर, आणि निलेश कोळेकर अशी आहेत. हे तिघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आधीच एकूण २८ गुन्हे दाखल आहेत.
जप्त मुद्देमालाचे तपशील:
२५ तोळे सोनं – १५.९३ लाख रुपये
चांदीचे दागिने – ११,००० रुपये
दुचाकी वाहन – ७०,००० रुपये
घरफोडीतील साधनं – कटर, कटावणी, स्क्रूड्रायव्हर
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि गुन्हे शोध पथकाने केली. या तपासात सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या कौशल्याचा मोठा वाटा आहे. आरोपींविरोधात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू गोसावी करत आहेत.
सराईत घरफोड्यांची टोळी गजाआड झाल्यामुळे नाशिककरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.