संदिप कसालकर
▶मुंबई । मेघवाडी पोलीस ठाणे, जोगेश्वरी पूर्वच्या आवारात १०५ वाहने गुन्ह्यातील व बेवारस अवस्थेत अनेक वर्षांपासून एकाच जागेवर उभे आहेत.त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलिसांनी १०५
वाहनांच्या मूळमालकांना शोधून काढले आहे. बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत, त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे दाखवून सात दिवसांत घेऊन जावीत अन्यथा, पोलिसांकडून त्या वाहनांचा लिलाव केला जाईल व पुढील प्रक्रिया पूर्ण
करण्यात येईल. त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाईल, अशी माहिती मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळुंके यांनी दिली.
पोलीस ठाण्यात शेकडो वाहने विविध गुन्ह्यांत पोलीस जप्त करतात. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षे मालकांच्या प्रतिक्षेत धूळखात पडून आहेत. या पार्श्वभूमीव मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पुढाकार घेत बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेत ती वाहने त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दहिया, परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे, मेघवाडी विभागाचे सहायक पोलीस उपायुक्त विनायक मेर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी पोलिसांनी परंदवाडी (ता. मावळ, जि. पुणे) येथील गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली. या संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात येत बेवारस
अवस्थेत असलेल्या वाहनांची पाहणी केली. राम उदावंत व पोलिसांनी बेवारस वाहनांचे चासी व इंजिन क्रमांकावरुन १०५ वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लावला. मूळ मालकांचा शोध लावण्यासाठी मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळुंके, पोलीस हवालदार इंदूमती शिरसाट,पोलीस शिपाई दीपक फडतरे,पोलीस शिपाई विनय तांबे,पोलीस शिपाई दीपक वाघमारे,पोलीस शिपाई सागर कांबळे यांच्यासह गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत,
उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे,भारत वाघ, पोपट शिंदे यांनी परिश्रम घेतले.