प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील उपद्रवी गुंड-गुन्हेगारांचा बंदोबस्त करत आहेत. या अनुषंगाने पोलीसांनी कारवाई सुरू केली आहे.

कल्याण क्राईम ब्रँचच्या युनिट-३ ने डोंबिवलीत घातपात घडविण्याचा डाव हाणून पाडला आहे. दहशत माजवण्यासाठी धारदार चॉपरचा खुलेआम वापर करणाऱ्या दोघा गुंडांचा गुन्हे शाखेच्या कर्तबगार पोलीसांनी कणा मोडून काढला आहे. विशाल मुकेश उर्फ संदीप जेठा (वय: २१ वर्षे) आणि कुणाल इतवारी बोध (वय: २३ वर्षे) दोघे राहणार त्रिमूर्ती नगर झोपडपट्टी, शेलार नाका, डोंबिवली (पूर्व) अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. तसेच रामनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील हद्दपार केलेला गुंड अतुल उर्फ कुंदन बाळू अडसूळ (वय: ३० वर्षे), राहणार इंदिरानगर झोपडपट्टी डोंबिवली (पूर्व) हा त्याच्या घरी पत्नी व मुलीला लपून-छपून भेटायला आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सविस्तर वृत्त असे की मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले आणि सतीश सोनवणे यांना त्यांच्या खासगी गुप्तहेरांकडून धक्कादायक माहिती मिळाली की एसबी शेलार नाक्याजवळ दोन तरूण यामाहा आर१५ दुचाकीवर आले आहेत. त्यातील मागे बसलेल्याच्या हातात भला मोठा धारदार चॉपर असून हे दोघे परिसरात दहशत निर्माण करत फिरत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना देण्यात आली. शिंदे हे स्वतः तात्काळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांच्यासह पोशि. सतीश सोनवणे, प्रशांत वानखडे, विलास कडू, अनुप कामत, सचिन वानखडे, विजेंद्र नवसारे, वसंत चौरे, ज्योत्सा कुंभारे, मीनाक्षी खेडकर या त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. पथकाने क्षणाचाही विलंब न लावता दोघांची धरपकड केली. त्यांच्याकडून २५ इंच लांबीचा चॉपर हस्तगत करण्यात आला.

या दोन्ही गुंडांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. ९५०/२०२४ शस्त्र अधिनियम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही गुंड आरोपी रामनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अट्टल रॉबर आणि सराईत चोर म्हणून गुन्हेगार आहेत. यांच्याकडून एकूण २ लाख ५३० रुपये किंमतीची यामाहा कंपनीची आर१५ दुचाकी व दोन्ही बाजूने धार असलेला लोखंडी चॉपर, असा मुद्देमाल जप्त केल्यानंतर त्यांना रामनगर पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे. या गुंडांचा उपद्रव संपुष्टात आल्यामुळे परिसरातील त्रस्त रहिवासी, व्यापारी आणि दुकानदारांनी पोलीसांचे कौतुक केले.

तसेच बुधवारी सायंकाळच्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील पोलीस उपायुक्तांनी १८ महिन्यांकरिता हद्दपार अर्थात तडीपार केलेला नामचीन गुंड अतुल उर्फ कुंदन बाळू अडसूळ (वय: ३० वर्षे), रा. इंदिरानगर झोपडपट्टी डोंबिवली (पूर्व) हा त्याच्या घरी पत्नी व मुलीला लपून- छपून भेटायला आल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांच्यासह सतीश सोनवणे, प्रशांत वानखडे, विलास कडू, अनुप कामत, सचिन वानखेडे, विजेंद्र नवसारे, वसंत चौरे यांनी घराभोवती वेढा घालून या गुंडाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. ०९५५/२०२४ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला पुढील कारवाईसाठी डोंबिवली पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण च्या पोलीसांनी कर्तव्यदक्ष राहून केलेल्या कारवाईचे वरिष्ठांकडून व सर्व स्तरातील नागरिकांकडून स्वागत व कौतुक होत आहे.