प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात नायजेरियन तस्करांकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचं पोलीसांच्या कारवाईत उघड झालं आहे. डोंबिवली जवळील उंबार्ली गणेशनगर परिसरात पोलीस उपायुक्तांच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून एक नायजेरियन नागरिकासह अंबरनाथमधील दोन तस्करांना रंगेहाथ पकडलं. या तिघांकडून मेफोड्रोन आणि कोकेन या अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २ कोटी १५ लाख
८० हजार रुपये असल्याची माहिती कल्याण विभाग परिमंडल-३ चे उपयुक्त अतुल झेंडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

मागील वर्षभरात १४६ तस्करांना अटक

मागील वर्षभरात कल्याण-डोंबिवली शहरातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १४६ तस्करांना अटक करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांत एकूण १०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान तस्करांकडून ६ कोटी ३६ लाख १४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये २४४ किलो ८१८ ग्रॅम गांजा, १११ ग्रॅम चरस, १८०० कोडीनयुक्त बाटल्या, निंदिया गोळ्या, निट्राझेपम गोळ्या तसेच ४ किलो १४७ ग्रॅम एमडी पावडरचा समावेश आहे.

याच पार्श्वभूमीवर अंमली पदार्थविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार राहुल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर, देवरे आणि खरसाण यांचे पथक शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) डोंबिवली-शिळफाटा रस्त्यालगत उंबार्ली गाव हद्दीतील गणेशनगर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी तीन इसम संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यापैकी एक जण नायजेरियन नागरिक असल्याने पोलीसांचा संशय अधिक बळावला.

१७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

अविनाश व्यंकटेशन सदरला (वय: ३४ वर्षे) हा अंबरनाथ पश्चिम येथील पनवेलकर आयकॉन सोसायटीत राहतो. गजेंद्रन संजीव नायडू (वय: ३४ वर्षे) हा अंबरनाथमधील नवरे पार्क, चिंचपाडा येथील दोस्ती कॉलनीमध्ये राहतो. त्यांच्यासोबत एक नायजेरियन नागरिक असून तो पलावा सिटी या हायप्रोफाईल सोसायटीत मागील २ ते ३ वर्षांपासून राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

या तिघांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे २ कोटी रुपये किमतीचा मेफेड्रोन (एम.डी.) साठा, १५ लाख रुपये किमतीचे कोकेन, २१ हजार रुपये रोख रक्कम तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली.

दरम्यान, पोलीस त्यांच्या दिशेनं येत असल्याचं पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलीसांनी तत्काळ झडप घालून त्यांना पकडले. अंगझडती आणि दुचाकीच्या डिकीची तपासणी केली असता एम.डी. पावडर व कोकेनचा साठा आढळून आला. त्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

त्यांच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढे त्यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस कारवाईमुळे तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले

दरम्यान, मागील वर्षभरात कल्याण पोलीस परिमंडल-३ अंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १४६ तस्करांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी दोन प्रकरणांमध्ये तस्करांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षात कल्याण पोलीस परिमंडळानं अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन आंतरराज्य टोळ्यांना अटक केली होती. या कारवाईदरम्यान गांजा, चरस, कोडीनयुक्त सिरपच्या बाटल्या, निंदिया गोळ्या तसेच निट्राझेपम गोळ्या असा साठा जप्त करण्यात आला. या कठोर कारवाईमुळे कल्याण-डोंबिवली शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.