
संदिप कसालकर
जोगेश्वरी पूर्वमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही “एक पोळी होळीची, भुकेल्याच्या मुखाची” हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दहीहंडी मंडळांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला जातो, ज्यामध्ये नागरिकांना होळीत पुरणपोळी टाकण्याऐवजी ती गरजूंसाठी दान करण्याचे आवाहन केले जाते.

यावर्षीही विविध मंडळांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मंडळांच्या ठिकाणी खास खोके ठेवून नागरिकांनी प्रेमाने पुरणपोळ्या दान केल्या. जमा झालेल्या पोळ्या रात्री व्यवस्थित पॅक करून दुसऱ्या दिवशी सुभाष नगरमधील बेघर कुटुंबांना वाटण्यात आल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना स्वादिष्ट पुरणपोळीचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली, तसेच त्यांच्यासोबत रंगपंचमीही साजरी करण्यात आली.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने पोळ्यांचे दान झाले. एकूण १८७ पुरणपोळ्या जमा झाल्या असून त्या गरजूंना वितरित करण्यात आल्या. या उपक्रमाला शामनगरमधील गुरुकृपा हाऊसिंग सोसायटी, शामनगर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रॉयल गाईज क्रिडा मंडळ (मेघवाडी), सर्वोदय नगर, श्री साई श्रद्धा सेवा संस्था, गुंदवलीचा मोरया, स्वराज प्रतिष्ठान आणि गांधीनगर (जोगेश्वरी पूर्व) येथील मंडळे आणि रहिवाशांनी मोलाचे सहकार्य केले.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढील व्यक्तींचे विशेष योगदान:
संतोष सावंत, कांचन सावंत, शिवाजी खैरनार, रूपल खैरनार, स्मिता सावंत, पूजा दळवी, दत्ता वाघ, जिग्नेश पटेल, प्रकाश खानविलकर, अंकुश पवार, अश्विनी मगर